Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

आयुष्याच्या वाटेवर.... कु. गायत्री निकम

आयुष्याच्या वाटेवर... किती विचित्र असते ना आयुष्य !! अगदी गमतीचे, जे पाहिजे ते मागुनही मिळत नाही आणि नको असते ते न मागताही आधीच पदरात पडलेले असते. आयुष्य म्हणजे नक्की काय ? हा नेहमी पडणारा प्रश्न आहे. प्रत्येक गोष्ट अनुभवाने शिकणे म्हणजे आयुष्य आहे का? आयुष्य ही संकल्पना फक्त मानवालाच व्यवस्थित समजली आहे, पण त्याला याची काहीच किंमत वाटत नाही. मानव हा पृथ्वी तलावरील सर्वांत लोभी आणि हव्यासी प्राणी आहे. आपल्या स्वार्थासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आपल्यासोबत वाईट घडले तरी चालेल पण कोणा दुसऱ्यासोबत चांगले घडू नये असे विचार आजच्या स्वार्थी पिढीचे आहेत. या जगात माणसांना स्वतःच्या अपयशापेक्षा दुसऱ्याचे यश बघूनच जास्त त्रास होतो. नीट विचार केला तर माणसाच्या प्रत्येक कृतीमागे स्वार्थ दडलेले असते. कधीतरी या स्वार्थी जगातून बाहेर पडून स्वतःला एक प्रश्न विचारा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यत चाललेली धावपळ तारेवरची कसरत आपण नेमकं कोणासाठी करतो आणि का करतो ? खरं तर तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तरीही स्वतःला विचारून बघा. 99% लोकांचे उत्तर हे भविष्यासाठी असेल. वर्तमानकाळात जी काही धावपळ चाललेली असते ती फक्त भविष्यासाठी असते. आयुष्य तरी कितीसे असते पण त्यातही हा हव्यास.... माझ्या फक्त प्रत्येक क्षण आनंदाने जगणे म्हणजे आयुष्य आहे. काहीही म्हणा पण मिळणाऱ्या गोष्टीपेक्षा न मिळणाऱ्या गोष्टीचे आकर्षण अधिक असते याचे कारण म्हणजे हव्यास व स्वार्थ, प्रत्येक गोष्टीत उणीव शोधण्याची वृत्ती. आयुष्यातील सर्वांत किमती आणि मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद! दिवसभर मजुरी फरून जेमतेम कुटूंबाचे पोट भरु शकेल अशी व्यक्ती पाणी झोपते पण पिऊन का होईना निश्चिंत मनाने झोपते. पण करोडोंची संपत्ती असलेल्या व्यक्तीला शांत झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागतात असे का बरे असावे ? याचे उत्तर म्हणजे समाधान । जे आहे, जसे आहे ते आपलेच मानून मनापासून स्विकार करणे म्हणजे समाधान! हल्ली तेच तर कमी होत चाललय. एकांतात बसून कधी तरी स्वतः ला प्रश्न विचारा आपण नक्की कोणासाठी जगतोय? आणि का जगतोय ? मी तर म्हणेल आनंदापेक्षा समाधान शोधा. आयुष्य जास्त सुखकर होईल. अपयश आले म्हणून प्रयत्न करणे थांबवायचे नसते. जे होते ते चांगल्यासाठीच होते असा विचार करून, एक नवीन अनुभव घेऊन, नव्या उमेदीने पुन्हा प्रयत्न करावे. एखाद्या गोष्टीचा अंत होतो, तिथेच काही तरी नवीन निर्माण होत असते, जसे अळीचे फुलपाखरात रूपांतर होऊन निसर्गाला एक नवी देणगी मिळते. निराशेचा सूर्य मावळून दुसऱ्या दिवशी पुन्हा आशेचा नवा किरण घेऊन येतो. खरा आनंद हवा असेल तर दिवसातील थोडा तरी वेळ एकांतात घालवा कारण एकांतात स्वतःचा स्वतःशीस संवाद होतो. डोकं शांत झाल की आपोआपच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि मनात आनंदाचा शिरकाव होतो. आनंद हा शोधल्याने सापडत नाही तर तो मानावा लागतो. तुम्हीही प्रत्येक गोष्टीत आनंद माना. बेफिकर होऊन स्वतःसाठी जगून बघा. भविष्याची काळती सोडून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आणि खरा आनंद हवा असेल तर कुठल्याच गोष्टीत Option शोधत बसू नका. एखादा प्रश्न खूप प्रयत्न करूनही सुटत नसेल तर काही काळासाठी त्याला सोडून दया, तो आपोआप सुटेल. कारण जास्त विचार केल्यामुळे त्याचा गुंता अधिक वाढतो. नवनवीन आव्हाने स्वतः पेलून बघा. यशस्वी झालात तर आनंद मिळेल आणि अपयशी झालात तर अनुभव आणि शिकवण. यशापेक्षा अपयश माणसाला खूप काही शिकवून जाते. अपयशी झाल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही कारण ठेच लागल्याशिवाय माणूस नीट चालायला शिकत नाही. तुम्हीही प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आणि जीवनात नवनवीन धडे घेत आनंदाने जगा!!
कु. निकम गायत्री शिवाजी (12 वी कला अ) कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय विंचूर, ता.निफाड, जि.नाशिक

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. लहान वयात असून खूप छान विचार

    ReplyDelete