Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

'अमृत भारत स्थानक योजना' अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार उद्घाटन

शरद लोहकरे, लासलगाव ...

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या योजनेतून नाशिक जिल्ह्यातील  मनमाड रेल्वेस्थानक आधुनिकीकरण  रु.४४.८० कोटी, नगरसुल रेल्वेस्थानक आधुनिकीकरण  रु. २०.०३ कोटी, लासलगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण  रु.१०.१० कोटी, नांदगाव रेल्वेस्थानक आधुनिकीकरण  रु. १०.१४ कोटी,  निधी मंजूर करण्यात आला असून  या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास  होऊन रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मनमाड, चाळीसगाव, शेगाव, बडनेरा, मलकापूर, नेपानगर या सहा रेल्वे स्थानकावर रविवारी (दि. ६) सकाळी ९ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मनमाड येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार उपस्थित राहणार आहेत व  नांदगाव विधानसभा  मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे देखील उपस्थित राहणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील ५०८  रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.  या कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, रेल्वे राज्यमंत्री दर्शना ज़रदोष यांची उपस्थिती असणार आहे.

या योजनेअंतर्गत विविध अद्यावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरीकांकडुन सर्व स्तरावर आनंद व समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानक  प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे.विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतीक्षागृह स्वच्छतागृह, नवीन फूटओवर बीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.   जिल्ह्यातील चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायी होण्यासाठी रेल्वेस्थानकांचा  पुनर्विकास करण्यासाठी भरीव निधीची तरतूद केल्याने  डॉ. पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व रेल्वे मंत्रालायचे आभार व्यक्त केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.