देशाच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबाना अनेक दुःख घेऊन जगावे लागते. शहीद झालेल्या पतीच्या निधनाने तर जवानांच्या पत्नीचा आधारच खुंटून जातो. मात्र डोळ्यातील अश्रू पुसून हार न मानणाऱ्या शहीद परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावच्या विरणारी वीरमाता बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्षा रेखाताई खैरनार या रणरागिणीचा आदर्श समाजापुढे नक्कीच प्रेरणादायी आहे.
भारतीय महिला ही केवळ चूल व मूल यामध्ये रमलेली अबला नाही, हे समाजाला दाखवून देणाऱ्या रणरागिणीला कारगील विजय दिवसानिमित्त भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. १९९९ साली झालेल्या शिमला करारचे उल्लंघन करून पाकिस्तानने कारगीलमध्ये युद्ध छेडले,आणि त्या युध्दात रेखाताई यांचे पती एकनाथ खैरनार हे पाकिस्तान सैन्याशी लढताना शहीद झाले, त्यांना मरणोपरांत सेना मेडलने सन्मानित करण्यात आले, रेखा ताई यांचे पती शहीद झाले तेंव्हा त्यांचा मुलगा गोवर्धन अवघ्या सहा ते सात महिन्याचा होता, पती जाण्याचं दुःख तर होतच, पण मागे होती सहा महिन्याच्या गोवर्धनची जबाबदारी, परंतु त्यांनी परिस्थिती समोर हार न मानता उलट परिस्थिती वर मात करत गोवर्धनला सांभाळायची जबाबदारी घेतली. शासनाने त्यांना शासकीय नोकरी दिली,काही दिवस त्यांनी जिल्हा परिषद ला नोकरी केली,परंतु त्यांच्याकडे शहीद परिवाराच्या समस्यासाठी वीरनारी, वीरमाता, यांची ये जा सुरू झाली त्यांनी सर्व नाशिक जिल्हा सह महाराष्ट्रातील शहीद परिवाराना मार्गदर्शन व मदत करण्याचे ठरवले, त्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन शहीद परिवारांना एकत्र करून वीरनारी वीरमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना केली, शहीद परिवाराच्या समस्या सोडविण्यासाठी त्या नेहमी तत्पर असतात, शहीद परिवाराना आपला हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक केला, कितीतरी राजकीय नेते, शासकीय अधिकारी यांच्यासोबत संघर्ष करून न्याय मिळवुन दिला, आजही शहीद परिवारांसाठी त्या जिवाचं रान करत आहे, स्वतःच्या घराची चिंता, तब्बेतीची काळजी न करता हे समाजसेवेच व्रत करणाऱ्या रणरागिणीला कारगील विजय दिवसानिमित्त भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांचे महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे.


