विंचूर ता.२६
चंद्राच्या भ्रमणानुसार तिथी मानल्या जातात, सूर्याच्या भ्रमणानुसार तारीख मानली जाते,पृथ्वीच्या आणि चंद्राच्या भ्रमणानुसार प्रत्येक वर्षाला ११ दिवस वाढवा शिल्लक राहतात, त्यामुळे तीन वर्षांनी एक महिना पूर्ण तयार होतो.तो अधिक मास होय.संपूर्ण जगातील वैज्ञानिक- शास्त्रज्ञांनी ते मान्य केलेले आहे.जागतिक भूगोल खगोल वरिष्ठ संस्था "नासा" यांनी सुद्धा आपल्या शास्त्राचा भौगोलिक अभ्यास केला आहे. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताचे अध्यक्ष हभप एकनाथ महाराज सदगीर यांनी केले.
विष्णूनगर येथे अधिक मासानिमित्त आयोजित सप्तकलश या कीर्तन महोत्सवात 'तुका झाला से कळस' या विषयावर ते बोलत होते.
पुढे बोलतांना सदगीर महाराज म्हणाले,भारतीय कालगणना हे अत्यंत सखोल शास्त्र आहे.या कालगणनेचा अभ्यास करणे म्हणजेच अध्यात्माचा विचार करणे होय. अध्यात्माला भौगोलिक आधार कसा आहे हे वेगवेगळे उदाहरणे देऊन स्पष्ट केले.त्यानंतर नाम , भक्ती , निसर्ग , वैराग्य ,साक्षी ,कल्प ,सर्वात्मक या सप्तकलशाचे निरूपण केले.

