शरद लोहकरे, लासलगांव...
राज्य शासनाच्या निर्णयानुसार माहे फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये लासलगांव बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्यास अनुदान मिळणेसाठी शेतकरी बांधवांनी तात्काळ बाजार समितीकडे प्रस्ताव सादर करावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीच्या प्रशासक सविता शेळके यांनी केले.
चालु वर्षी कांदा बाजारभावातील घसरणीमुळे राज्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने माहे फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये लाल (लेट खरीप) कांदा हा शेतीमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रू.३५०/- प्रती क्विंटलप्रमाणे एकुण २०० क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देणेसाठी योजना जाहीर केलेली आहे. त्यानुसार दि.१ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर कांदा हा शेतीमाल विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शासन निर्णयानुसार कांदा अनुदान मिळण्यासाठी दि.१ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांदा हिशोब पावत्यांच्या मुळ प्रती, स्वतःच्या नांवे कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बँक पासबुकाची पहिल्या पानाची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत (शाखेचे नांव, कोड क्रमांक, बचत खाते क्रमांक, IFSC Code व MICR Code इ. पडताळणीसाठी), आधारकार्डची झेरॉक्स प्रत, ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडीलांच्या नांवे व विक्री पावती मुलाच्या अथवा अन्य कुटूंबियांच्या नांवे आहे अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र इ. सह दि. ३ एप्रिल२०२३ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत ज्या बाजार आवारावर कांदा विक्री केलेला आहे त्या ठिकाणच्या कार्यालयात अनुदान मागणी अर्ज सादर करावे. सदर अनुदान मागणी अर्ज बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपकार्यालयांत विनामुल्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
तरी शेतकरी बांधवांनी अनुदान प्राप्त करून घेणेसाठी बाजार समितीकडुन कांदा अनुदान मागणी अर्ज घेऊन त्याप्रमाणे सर्व कागदपत्रांची विहीत मुदतीत पुर्तता करून द्यावी असे आवाहन शेळके यांनी केले आहे.

.jpeg)