शिवसेना नेते भाऊसाहेब धोंगडे यांचा इशारा
लक्ष्मण सोनवणे, इगतपुरी
इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम गेल्या वर्षभरापासून संथ गतीने सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी वा वाहनधारकांचे जाण्या येण्याचे मोठे हाल सुरु आहे. मुकणे धरणातील आवर्तनामुळे बांधकाम विभागाने बनवलेला तात्पुरता रस्ता पाण्याने सतत धुवून जात असतो. परिणामी ह्या भागाचा संपर्क तुटतो. नांदगाव बुद्रुक, पाडळी देशमुख मार्गे दूरवरून लोकांना मार्गक्रमण करावे लागते. ह्या ओंडओहोळ नदीवरील पुलाचे काम जलदगतीने करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नेते भाऊसाहेब धोंगडे यांनी दिला आहे. अस्वली स्टेशन ते मुंढेगाव हा रस्ता नागरिकांसाठी महत्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरील पुलाचे काम इगतपुरीच्या सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संथ गतीने सुरू आहे. मुंढेगावकडे जातांना येतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 12 आदिवासी वाड्यांकडे जाणाऱ्या ह्या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लागणे महत्वाचे आहे.
एक वर्षांपासून ओंडओहोळ नदीवरील पुलाचे काम अपूर्ण व धीम्या गतीने सुरू आहे. आदिवासी नागरिक, शेतकरी, आरोग्यसेवा, विद्यार्थी आदींचे हाल होत आहे. पाऊस सुरू झाल्यास लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे पुलाचे काम मार्गी लावावे. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेचे भान ठेवून लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
- भाऊसाहेब धोंगडे , शिवसेना नेते


