ह.भ.प. वासुदेव दुसाने यांचा अमृतमहोत्सव सोहळा ठरला ऐतिहासिक
January 07, 2023
0
नेत्रदीपक सोहळ्यास लाभली लाखोंची उपस्थिती
भाऊसाहेब हुजबंद यांसकडून...
शनिवार दि.७ जानेवारी २०२३ रोजी विंचूर येथील अपर्णा प्राईड या लॉन्सवर सुवर्णकार समाजाचे प्रसिद्ध उद्योजक तथा ह. भ. प. वासुदेव दुसाने यांचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा अतिशय उत्साहापूर्ण, भक्तिमय वातावरणात, हजारो नागरिकांच्या तसेच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवला लासलगाव मतदार संघांचे आमदार छगन भुजबळ यांच्या हस्ते वासुदेव दुसाने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री भुजबळ यांनी श्री दुसाने काकांना शुभेच्छा दिल्या.
श्री दुसाने काकांच्या या अमृत महोत्सवानिमित्त श्री वासुदेव (काका) वामन शेठ दुसाने अमृत महोत्सव समिती व दुसाने मित्र परिवाराच्यावतीने रविवार दिनांक १ जानेवारी २०२३ते ७ जानेवारी २०२३ यादरम्यान हरिभक्त परायण श्री आचार्य अमृता आश्रम स्वामी महाराज तथा अमृत महाराज जोशी बीड यांच्या रसाळ वाणीतून श्री संत चरित्र कथामृत तसेच भजन सम्राट पं. शंकरराव वैरागकर (सर) यांची भजन संध्या दररोज सायंकाळी आयोजित करण्यात आलेली होती. या सोहळ्याच्या आयोजित ठिकाणी अपर्णा प्राईड या लॉन्सवर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. स्टेजवर संताचे कटाऊट लावण्यात आले होते.प्रवेश द्वारावर अनेक संतांचा अल्प परिचय असलेले फोटो लावण्यात आलेले होते. दुचाकी, चारचाकी वाहनांची उत्तम पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली होती. गावातील भाविकांना संत चरित्र कथेचा लाभ घेता यावा यासाठी बस ची व्यवस्था करण्यात आली होती. कडक्याची थंडी असतांना देखील भाविकांची उपस्थिती दिवसेंदिवस वाढतच होती. तर कथेचा सर्वांना लाभ घेता यावा यासाठी लाईव्ह प्रक्षेपणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.
या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने विंचूर गावातील तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा शाल, विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त विंचूर येवला तसेच परिसरातील पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन दिलीप कोथमीरे सर यांनी केले. श्री दुसाने काकांचा विचूर तसेच पंचक्रोशीतील मान्यवर पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा नेते अविनाश दुसाने, अतुल दुसाने व त्यांचे सर्व सहकारी मित्रपरिवार यांनी अनमोल सहकार्य केले.


