निष्काम कर्माने देव भेटतो - अमृत महाराज
January 06, 2023
0
निष्काम कर्माने देव भेटतो - अमृत महाराज
विंचूर दि.६(प्रतिनिधी)
कर्मात तत्पारता असेल तर साधनेने जे मिळत नाही ते कर्माने मिळते, कारण एकीकडे संपूर्ण जग देवाला भेटण्यासाठी आतुर असतांना देव मात्र शेतात राबणाऱ्या सावता महाराजांना भेटण्यासाठी शेताच्या बांधावर जातो. सावता महाराजांनी कर्मात देव शोधला, निष्काम कर्माने देव भेटतो असे प्रतिपादन बीड येथील अमृत महाराज जोशी यांनी केले.अमृत महाराज हे येथील वारकरी संप्रदायाचे पाईक व दुसाने ज्वेलर्सचे संस्थापक ह.भ.प.वासुदेव दुसाने यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील अपर्णा प्राईड येथे वासुदेव काका दुसाने अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित संत चरित्र कथामृताचे संत सावता महाराजांचे जीवन चरित्रावर पाचवे पुष्प गुंफताना बोलत होते.
प्रारंभी ह.भ.प.देवराम बाबा बोंबले यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले. पुढे बोलताना अमृत महाराज यांनी जीवनात संकट येतील जातील मात्र परमार्थिक मार्गावरील पाऊल मागे घेऊ नये, दुसऱ्या धर्माला दोष देण्यापेक्षा आपल्यात सुधारणा करावी. वैचारिक अग्नी निमाल्यावर ज्ञान ज्योतीने प्रज्वलित करावा लागतो. आणि ज्ञान ज्योत प्रज्वलित करण्याचं काम संत करतात असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी माजी जि.प.अध्यक्ष तथा व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे,ह.भ.प. एकनाथ महाराज भांडे,ह.भ.प.शाम महाराज ठोंबरे, ह.भ.प. जलाल महाराज सैय्यद, ह.भ.प.गोपाल महाराज भांडे, ह.भ.प.रघुनाथ महाराज खटाणे, ह.भ.प.संजय महाराज ठुबे, ह.भ. प.बाळासाहेब जोशी, ह.भ.प. निलेश महाराज निकम, सुधा कुलकर्णी. आदींसह विंचूर व परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिलीप कोथमिरे सर यांनी केले.


