Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, त्र्यंबकेश्वरचे गुरुपीठ केंद्रामध्ये श्री दत्तात्रेय जन्मोत्सव साजरा

 

दिंडोरी - येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आणि देश आणि विदेशातील हजारो समर्थ केंद्रामध्ये आज अमाप उत्साहात, भावपूर्ण, मंगलमय वातावरणात श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी बरोबर 12 वाजून 39 मिनिटांच्या मुहूर्तावर " अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त " असा जयघोष करत श्री दत्तात्रेय जन्माचा आनंद व्यक्त केला.

मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेस संपूर्ण भारतभर श्री दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. करोडो भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस म्हणजे एक भावभक्तीचा आनंद सोहळा असतो.गेल्या एक आठवड्यापासून हजारो समर्थ केंद्रावर श्री दत्त जयंती सप्ताहाची लगबग दिसून येत होती. या सप्ताहाच्या निमित्ताने हजारो केंद्रात लाखो अबालवृद्ध सेवेकऱ्यांनी श्रीगुरुचरित्र पारायणासह विक्रमी सेवेत सहभाग नोंदवला.

आज भल्या पहाटेपासून सर्व समर्थ केंद्रावर श्रीदत्त जन्म सोहळ्याची लगबग सुरु होती. सकाळी आरतीची व इतर सेवा रुजू झाल्यावर दुपारी बरोबर बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी श्रीगुरुचरित्रातील चौथ्या अध्ययाचे वाचन सुरु करण्यात आले ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी या अध्यायातील " तीन बाळे झाली " या ओवीचे वाचन होताच उपस्थित सेवेकऱ्यांनी "अवधूत चिंतन " चा जयघोष करत आनंद व्यक्त केला.यानंतर आरती झाली.
दिंडोरी, त्र्यंबकेश्वर सह आजचा सोहळा संपूर्ण राज्य व राज्यबाहेर जवळपास 21 राज्यांमध्ये संपन्न झालाच पण भारताबाहेर अमेरिका, इंग्लंड, ओमान, दुबईसह अनेक देशांमधील महानगरातही मोठया उत्साहात संपन्न झाला. विशेषतः बोस्टन, न्यू जर्सी, न्यूयार्क, डेट्रोईट, डल्लास, अटल्यांटा, रैले, सैन जोस, लॉस  एंजलीस या महानगरामध्ये नव्यानेच सुरु झालेल्या केंद्रात सेवेकऱ्यांनी हा सोहळा मनोभावे साजरा केला.
दिंडोरी येथे उपस्थित देशभरातून प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या सेवेकरी, भाविकांशी गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांनी हितगुज केले. गुरुमाऊली म्हणाले, "आज आपल्या दृष्टीने अत्यंत परमपावन, चैतन्यदायी दिवस आहे. आज सर्व भारतीयांना चैतन्य पुरवठा करणाऱ्या, कायम आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या श्रीदत्त महाराजांचा जन्मसोहळा आहे.श्रीदत्त महाराजांनीच श्री स्वामी समर्थ रूपात देशभर कार्य केले. आज श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून देश आणि समाजासाठी अथकपणे काम सुरु आहे. कृषी, विवाह मेळावे समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. बालसंस्कार, भारतीय संस्कृती व अस्मिता, दुर्गाभियान, यज्ञ, वास्तुशास्त्र, मानवी समस्या, नैसर्गिक आपत्ती निवारण, कर्ज निवारण, विविध आजारावर मात यासाठी मार्गदर्शन,असं विविध स्वरूपाचे कार्य आज जगभर सेवेकरी करीत आहेत."
श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे महत्व गुरुमाऊलींनी स्पष्ट केले. या ग्रंथाचे वाचन केल्याने भाविकांचे विविध प्रश्न, समस्या मार्गी लागून प्रचंड आत्मविश्वास वाढीस लागतो. असा विश्वास गुरुमाऊलींनी दिला.
दिवसभरात आलेल्या हजारो सेवेकरी, भाविकांना प्रसादवाटप करण्यात आले.
दिवसभर शहरी व ग्रामीण भागातील भाविकांनी समर्थ केंद्रावर हजेरी लावून या सोहळ्यात हजेरी लावून दर्शन व आशीर्वाद घेतले.
आजच्या सोहळ्यात वेदमूर्ती गणपती व विजयअप्पा शिखरे यांनी हजेरी लावली तर मुकुंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.   


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.