Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

14 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित ‘रील स्टार’

14 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित ‘रील स्टार’

काही चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून वास्तव जीवनाचे यथार्थ दर्शन घडवत अंतर्मुख करतात. त्यापैकीच एक असलेल्या ’रील स्टार’ या आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबतचे कुतूहल अधिक वाढले असून, संगीत प्रकाशनानंतर या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालू लागली आहेत. प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा चित्रपट 14 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सशक्त कथानक, कसदार अभिनय, नेत्रसुखद सादरीकरण, प्रयोगशील दिग्दर्शन, सुमधूर गीत-संगीत अशा बर्‍याच वैशिष्ट्यांनी नटलेला ’रील स्टार’ प्रेक्षकांचे परिपूर्ण मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.या चित्रपटात रील स्टारची गोष्ट पाहायला मिळणार हे शीर्षकावरून सहज लक्षात येते. आजचा जमाना रील स्टारचा आहे. आज मनोरंजनासोबतच समाजात घडणार्‍या घटना आणि जनमानसांत उमटणारे प्रतिबिंब टिपण्याचे काम रील स्टार करत आहेत. ’रील स्टार’ चित्रपटामध्ये भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा आहे. हा चित्रपट म्हणजे भानुदासच्या स्वप्नपूर्तीचा अनोखा प्रवास आहे. स्वप्नांना गवसणी घालताना त्याने दिलेला लढा पाहण्याजोगा असून, अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. भारतातील काही सर्वोत्तम चित्रपटांची निर्मिती करणार्‍या मल्याळम चित्रपट उद्योगातील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली ’रीलस्टार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. मल्टीस्टारर हिंदी-मराठी ’अन्य’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ’रील स्टार’चे दिग्दर्शन केले आहे. सिम्मी आणि कृष्णा एंटरप्रायझेस हे चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक सुधीर कुलकुर्णी यांनी ’रीलस्टार’चे लेखन केले आहे. या चित्रपटात वेगवेगळ्या मुड्समधील आणि वेगवेगळ्या प्रसंगाना अनुसरून एकूण पाच गाणी आहेत. ’दृश्यम’ फेम संगीतकार विनू थॉमस यांनी या चित्रपटातील चार गीतांना संगीतसाज चढवला असून, एक गाणे संगीतकार शुभम भट यांनी संगीतबद्ध केले असून शुभम भट यांनी सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे सहायक म्हणून काम केले आहे.या चित्रपटामध्ये भूषण मंजुळे, उर्मिला जे जगताप, प्रसाद ओक, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनय पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, जगदीश हाडप, पुनम राणे, अभय शिंदे, अनिल कवठेकर, विनिता शिंदे, प्रशांत शिंदे, करीश्मा देसले आदी कलाकार आहेत. याशिवाय बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील आहेत आणि मुख्य सहयोगी दिग्दर्शक नंदू आचरेकर आहेत. दीपक पांडे या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून, रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत. या चित्रपटातील व्यक्तिरेखांना भागवत सोनावणे यांनी रंगभूषा केली असून, राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे.  प्रोडक्शन डिझाईन राहुल शर्मा आणि समीर चिटणवीस यांनी केले असून निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केले आहे. सारेगामा अंतर्गत या चित्रपटातील गीते सादर करण्यात येत असून सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.