मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार दिलीप खैरे यांनी केली अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी*
*निफाड,लासलगाव,दि.३ ऑगस्ट:-*
मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार लासलगाव विंचूर सह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू असून दि.१० ऑगस्ट पर्यंत नवीन पाईप लाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप अण्णा खैरे यांनी विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या सुरू असलेल्या कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
यावेळी पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता श्री.निकम, छगन भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी उदयसिंग राजपूत, स्विय सहायक बाळासाहेब लोखंडे, अशोक गालफाडे, पांडुरंग राऊत, विलास गोरे, अनिल विंचूरकर, ओम राऊत यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
लासलगाव विंचूरसह सोळागाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सहा तारखेपर्यंत नूतन पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर दोन दिवस पाईपलाईनची सफाई तसेच चाचणी करण्यात येणार असून १० ऑगस्ट पर्यंत विंचूर एमआयडीसीतील फिल्टरेशन प्लांट मध्ये पाणी नियमित सुरू होऊन पाणी पुरवठा सुरळीत सुरू होणार आहे. याबाबत दिलीप खैरे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.



