![]() |
| डोंगरगाव येथे आत्माराम सांगळे यांच्या गायीचे ऑपरेशन करतांना डॉ. भाऊराव सांगळे समवेत डॉ. विलास भोर |
विंचूर ता.०३
विंचूर पासून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे पशुधन पर्यवेक्षक यांनी गायीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून पोटातून पंचेचाळीस किलो वजनाचे प्लास्टिक काढण्यात येऊन गायीला वाचवण्यात यश आले.यामुळे परिसरातूून पशुधन पर्यवेक्षक यांचे कौतुक करण्यात येत आहे.
डोंगरगाव येथील आत्माराम सांगळे यांनी सहा-सात दिवसापूर्वी गुजरात येथून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या दहा नवीन गायी खरेदी करून घरी आणल्या. त्यातील आठ महिने गाभण असलेली एक गाय दोन-तीन दिवसापासून चारा खात नाही म्हणून आत्माराम सांगळे यांनी विंचूर येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.भाऊराव सांगळे यांना बोलावले. डॉ. सांगळे यांनी गायीची तपासणी केली असता गायीच्या पोटात काहीतरी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर गायीच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार डॉ. सांगळे यांनी सेवानिवृत्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. विलास भोर यांच्या मदतीने सुमारे तीन तास गायीच्या पोटाची शस्त्रक्रिया करून त्यातून अंदाजे पंचेचाळीस किलो वजनाचे प्लास्टिकचे गोळे बाहेर काढण्यात यश आलेे.त्यामुळे गाईला जीवदान मिळाले.
गायीच्या पोटात सर्व कचरा गुंडाळला गेला होता त्यामुळे पोटात कचऱ्याचा एक मोठा गोळा बनला होता,त्यामुळे गाय चारा खात नव्हती.आम्ही तीन तासात पोटातील सुमारे पंचेचाळीस किलो कचरा बाहेर काढून टाकला.या कचऱ्यामध्ये ९०टक्के प्लास्टिक होते.औषध उपचारानंतर काही वेळेनंतर गाय चारा खायला लागली आहे.
डॉ. भाऊराव सांगळे,पशुधन पर्यवेक्षक,विंचूर

