विंचूरसह सोळागाव पाणी योजनेच्या नवीन पाईपलाईनचे काम पंधरा दिवसात न झाल्यास ठेकेदाराचे नाव ब्लॅक लिस्टमध्ये
विंचूर ग्रामपालिकेच्या सभागृहात अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिलीप खैरेंचा इशारा
लासलगाव विंचूर सह सोळा गाव पाणी योजनेच्या नवीन पाईपलाईन चे काम येत्या पंधरा दिवसात म्हणजे 12 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे अन्यथा ब्लॅक लिस्टमध्ये ठेकेदाराचे नाव टाकण्यात येईल असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी विंचूर येथील ग्रामपालिकेत अधिकारी व ठेकेदारांसमवेत झालेल्या बैठकीत दिला.
लासलगाव विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना जुनी झाल्याने वेळोवेळी पाईपलाईन फुटून पाणी गळती होत असतांना पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. त्यामुळे सोळा गावात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी या योजनेच्या नवीन पाईपलाईन तसेच सोलर सिस्टिम व नवीन टाक्या यासाठी वीस कोटी रुपये मंजूर केले. कामही सुरू झाले परंतु काम वेळेवर न झाल्याने नळधारकांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नवीन काम हे पूर्णत्वाकडे जात नव्हते त्यामुळे शासनाने पैसे देऊन सुद्धा पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे नामदार छगन भुजबळ यांनी दिलीप खैरे यांना विंचूर येथे जाऊन सदर कामाची माहिती घेण्यास सांगितले. त्यानुसार आज विंचुर ग्रामपालिकेच्या सभागृहात अधिकार्यांची व ठेकेदारांची बैठक घेतली यावेळी दिलीप खैरे बोलत होते.
सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विंचूर ग्रामपालिकेच्या सभागृहात सोळा गावचे सरपंच व अधिकार्यांच्या उपस्थितीत दिलीप खैरे यांच्या नेतृ्त्वात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप खैरे, लासलगाव ग्रामपालिकेचे सरपंच जयदत्त होळकर, विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर यांनी सोळा गाव पुरवठ्याच्या कामाबाबत अधिकार्यांकडून माहिती घेतली. यामध्ये ठेकेदार व अधिकार्यांच्या नाकर्तेपणामुळे सोळा गाव पाणी पुरवठा योजनेच्या नवीन कामास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी अधिकारी व ठेकेदारांना येत्या पंधरा दिवसांत दिवसात सोळा गाव पाणी योजनेच्या नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिलीप खैरे यांनी अधिकारी व ठेकेदारांना दिले.
यावेळी लासलगाव ग्रामपालिकेचे सरपंच जयदत्त होळकर, विंचूर ग्रामपालिकेचे सरपंच सचिन दरेकर, मरळगोईचे सरपंच अमोल थोरे, ठेकेदार अनिल काळे, पाणी पुरवठा विभागाचे बिन्नर, योगेश बत्तीसे, विलास गोरे, दत्तात्रय डुकरे, हरिश्चंद्र भवर, पांडूरंग राऊत, विनोद जोशी, बाळासाहेब पुंड, मंगेश गवळी, संतोष पलोड, गंगाधर गोरे, इस्माईल मोमीन, इम्रान मोमीन,शिवाजी सुपनर, माधव जगताप, सुरेखा नागरे, छबुराव जाधव, अशोक नागरे, अँड उत्तम नागरे, दत्तात्रय रायते, दत्तात्रय पाटील,जि.प.चे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता निकम, शाखा अभियंता पी.एस पाटील, गटविकास अधिकारी महेश पाटील, विंचूर ग्रामपालिकेचे ग्रामविकास अधिकारी जी.टी. खैरनार, लासलगावचे ग्रामसेवक शरद पाटील, पत्रकार डि.बी.काद्री, किशोर पाटील, भाऊसाहेब हुजबंद, नितीन गायकवाड, संदिप शिरसाट, दिपक घायाळ आदी उपस्थित होते.

