Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर सोसायटीचे संपूर्ण १२ संचालक अपात्र

लक्ष्मण सोनवणे,  इगतपुरी...




इगतपुरी तालुक्यातील पिंपळगांव मोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, पिंपळगांव मोर या सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमनसह संपूर्ण १२ संचालकांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यापासून ६० दिवसांच्या आत निवडणूक खर्च सादर केला नसल्याने संपूर्ण सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. यामुळे जिल्हाभरात सहकार क्षेत्राचे चांगलेच धाबे दणाणले आहे. इगतपुरीच्या सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे याबाबतचा आदेश पारित केला आहे.


नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निरीक्षक अशोक मधुकर साळवे यांची ह्या सोसायटीवर प्रशासक म्हणून तातडीने नेमणूक करण्यात आली आहे. सोसायटीचे सभासद युवराज तुकाराम गातवे यांनी दाखल केलेल्या विवाद अर्जानुसार दोन्ही पक्षांना उचित संधी देऊन सुनावणी घेण्यात आली होती. त्यानुसार हा आदेश पारित करण्यात आला. सुरु असलेल्या घोटी बाजार समिती निवडणूकीच्या काळात १२ जण अपात्र झाल्याने इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. ह्याचा दुरगामी परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दिसून येणार आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३, ७८ व नियम ५८ अन्वये प्राप्त अधिकारानुसार इगतपुरीच्या सहकारी संस्था सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांनी निरर्ह ( अपात्र ) ठरवलेल्या संचालकांत सुरेश संतु काळे, विजय भिका पवार, संतु नामदेव काळे, उत्तम एकनाथ बेंडकोळी, दत्तु चंदर पगारे, काळू देवजी मेंगाळ, मनोहर पोपट बेंडकोळी, भगवंता निवृत्ती सोनवणे, बाळू गोविंद बेंडकोळी, मिराबाई कचरू काळे, कौशाबाई संतु बेंडकोळी, गोरख बाजीराव काळे यांचा समावेश आहे. हे संचालक महाराष्ट्र सहकारी संस्था ( समिती निवडणुक ) नियम २०१४ व ( प्रथम सुधारणा ) नियम २०१८ मधील नियम ६६ अन्वये निरर्ह झाले आहे. ह्या आदेशानुसार संस्थेचे संचालक मंडळ अर्थात व्यवस्थापक समिती निष्प्रभावित झाली आहे. ह्या संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक झाली असून प्रशासक पदाचा कालावधी हा पदभार घेतल्यापासून ६ महिन्यांसाठी असणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.