विंचूरला भक्तिमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा
विचूर (प्रतिनिधी)...
प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव सकल हिंदू समाजाच्या वतीने येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राम नवमी निमित्त येथील श्रीराम मंदिरात चैत्र शु || १ गुढी पाडवा ते रामनवमी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गावातील विविध मंदिरात हनुमान चालीसा पाठाचे आयोजन करण्यात आले होते.
राम मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच गावात भगव्या पताका व भगव्या कमानी लावण्यात आल्याने संपूर्ण विंचूर परिसर भगवेमय झाले होते.सकाळच्या प्रहरात येथील काळाराम व गोरारामांच्या प्रतिमेस जलाभिषेक दुग्धाभिषेक, आरती आदी षोडशोपचार करण्यात आले. तसेच दुपारी १२:०० वा.राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
तर सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची सजविलेल्या पालखीतून वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेच्या मार्गावर महिलांनी रांगोळी काढून व पुष्प वर्षाव करत प्रभू श्रीरामांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. भगव्या साड्या व भगवे फेटे परिधान केलेल्या महिला व भगव्या टोप्या परिधान केलेल्या पुरुषांनी जय श्रीराम चा जयघोष करीत परिसर दणाणून सोडला होता. शोभायात्रेत पालखेड येथील प्रसिद्ध ढोलपथक तसेच प्रसिद्ध महाबली हनुमानाचा सजीव देखावा, हंबीराव सिनेमातील मावळे यांचा हिंदू राजा मर्दानी खेळ, भवानी लाईट पेपर ब्लास्ट आदी कलापथकांनी आपल्या कला सादर केल्या. आपापली आस्थापने बंद ठेऊन नागरीक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते.




