लासलगाव पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न
February 14, 2023
0
शरद लोहकरे लासलगाव
छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. तसेच प्राचीन भारतातील महान धनुष्यधारी आणि एक बलाढ्य योद्धा भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून ते उत्तम आहेत. सोशल मिडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी केले.
येत्या १८ फेब्रुवारीला भगवान विर एकलव्य जयंती व येत्या १९ फेब्रुवारी रोजी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होत असून या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती, वीर एकलव्य जयंती समिती व शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक लासलगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित करण्यात आली होती. लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील तंटामुक्ती समितीचे सर्व अध्यक्ष सर्व पोलीस पाटील तसेच वेगवेगळ्या गावातील शिवजयंती व एकलव्य जयंती साजरी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समित्यांचे पदाधिकारी बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे पंचायत समिती माजी सभापती शिवा पाटील सुरासे, विंचूर सरपंच सचिन दरेकर, काँग्रेसचे नेते गुणवंत होळकर ,लासलगाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच रामनाथ शेजवळ, शिरवाडे ग्रामपंचायत सरपंच श्रीकांत आवारे, भाजपाचे राजाभाऊ चाफेकर, रवि होळकर यांनी मनोगत व्यक्त केले. लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या गावातील उत्सव समिती यांच्या नियोजनाचा आढावा जाणून घेण्यात आला. या प्रसंगी लासलगाव पोलीस स्टेशनचे देविदास लाड साहेब पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल पोलीस पाटील व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे यांनी केली. यावेळी पीएसआय आजिनाथ कोठुले, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आजगे,पोलीस हवालदार कैलास महाजन, वाडीलाल जाधव सुजित बारगळ आदि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

