लासलगांव बाजार समितीच्या प्रशासकपदी श्रीमती. सविता शेळके यांची नेमणुक
January 11, 2023
0
शरद लोहकरे,लासलगाव
लासलगांव येथील कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव ह्या बाजार समितीच्या प्रशासकपदी चांदवडच्या सहाय्यक निबंधक श्रीमती. सविता शेळके यांची नियुक्ती करण्यात आली.
कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव ह्या बाजार समितीच्या विद्यमान सदस्य मंडळाची मुदत दि. १० मे २०२१ रोजी संपली होती. त्यानंतर लासलगांव बाजार समितीस राज्य शासनाने ०१ वर्ष वाढीव मुदत दिली होती. परंतू दरम्यानच्या काळात बाजार समितीची निवडणुक न झाल्याने तसेच वाढीव मुदतीचा कालावधी देखील संपल्याने जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दि.०९ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे कलम १५ (अ) अन्वये प्रशासक नेमणुकीचे आदेश तयार करून कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव ह्या बाजार समितीचे दैनंदिन व प्रशासकीय कामकाज पार पाडण्यासाठी श्रीमती. सविता शेळके, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चांदवड यांची बाजार समितीच्या प्रशासक पदी नियुक्त केली.
सदर आदेशान्वये श्रीमती. सविता शेळके यांनी आज बुधवार दि.११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी कृषि उत्पन्न बाजार समिती, लासलगांव ह्या बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयात येऊन त्यांच्या प्रशासक पदाचा पदभार स्विकारला.

