Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात पडला पार!

 



‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात पडला पार!

चित्रपटातील एनर्जीने भरलेली गाणी प्रेक्षकांच्या भेटीला!

‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी कुशा, बाबा आणि संत्या ही भन्नाट गँग आता मोठ्या पडद्यावर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटातून गोव्याची धमाल ट्रिप घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यात आता उत्सुकता वाढवली आहे आहे ती मामाच्या एन्ट्रीने. प्रेक्षक ट्रेलरची वाट बघत असतानाच आता चित्रपटातील गाणी भेटीला आली आहेत. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच ठाण्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात चित्रपटातील ‘लागले’ या गाण्याचे अनावरण करण्यात आले तसेच ‘डार्लिंग’ आणि ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या गाण्यांची झलक सादर करण्यात आली. हा दिमाखदार सोहळा ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम, कलाकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन पुष्कर श्रोत्री यांनी केले.

या संगीत अनावरण सोहळ्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमने, कलाकारांनी आणि संगीतकारांनी अक्षरशः रंगत आणली. पावसाळी वातावरणात गाण्यांवर ठेका, कलाकारांच्या भन्नाट गप्पा, शूटिंगदरम्यानच्या मजेशीर आठवणी आणि गोव्याच्या ट्रिपमागचे किस्से यामुळे संपूर्ण कार्यक्रम एका धमाल सेलिब्रेशनमध्ये रूपांतरित झाला. यावेळी उपस्थित प्रत्येकालाच हा चित्रपट म्हणजे मैत्री, मस्ती आणि फुल ऑन एंटरटेनमेंटचा डोस असणार असल्याची खात्री पटली आहे.

‘लागले’ हे गाणं पाहून चित्रपटात काय धमाल होणार, याचा अंदाज देतो. रवींद्र खोमणे यांचा जबरदस्त आवाज लाभलेल्या या गाण्याला अनुराग गोडबोले यांचे संगीत तर विजू माने यांचे हटके शब्द लाभले आहेत. गाण्याची कॅची हूक स्टेप आणि मजेशीर सादरीकरणामुळे हे गाणं संगीतप्रेमींना आवडणारे आहे. तसेच यावेळी ‘डार्लिंग’ आणि ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या शीर्षकगीतही सादर करण्यात आले. या तीनही गाण्यांनी चित्रपटाची धमाल, मैत्री आणि गोव्यातील मजेचा अनुभव दिला. ही सगळी गाणी खूपच कमाल असून ही गाणी पाहून मित्र गोव्याचा प्लॅन नक्कीच बनवतील.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “आज सादर झालेली तिन्ही गाणी अतिशय एनर्जेटिक आणि मनोरंजक आहेत. गाण्यांमधून चित्रपटाचा मस्त, बिनधास्त आणि एंटरटेनिंग मूड जाणवतो. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच भरपूर हसवेल. संपूर्ण टीमला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.”

संगीतकार अवधूत गुप्ते म्हणाले, “विजू माने यांच्यासोबत काम करताना नेहमीच काहीतरी वेगळं आणि हटके करण्याची संधी मिळते. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’मधील गाणीही त्याच विचारातून जन्माला आली आहेत. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याचा स्वतःचा फ्लेवर आणि धमाल आहे. विजूने चित्रपटात ज्या प्रकारची मैत्री, मस्ती आणि गोव्याचा उत्साह उभा केला आहे, त्याला संगीताने तितक्याच जोशात साथ देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना ही गाणी नक्कीच आवडतील आणि उर्वरित गाणीही त्यांच्या प्लेलिस्टमध्ये कायमची जागा मिळवतील, याची मला खात्री आहे.’’

चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक विजू माने म्हणाले, “‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा प्रत्येक क्षण मनोरंजनाने भरलेला आहे आणि त्याची सुरुवात या गाण्यांपासून होते. ‘लागले’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही खूप आनंदी आहोत. चित्रपटातील प्रत्येक गाणं वेगळी मजा घेऊन येतं. आता ही धमाल मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांसह आम्हीही आतुरतेने वाट पाहात आहोत.”

'विजुमेनिया प्रा. लि.' आणि 'लाईट अँड शेड' प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. या चित्रपटात कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असून ३१ जुलैला हा मैत्रीचा भन्नाट अनुभव घेऊन हा चित्रपट तुमच्या भेटीला चित्रपटगृहात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.