Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

'बोल बोल राणी'चा थरार १७ जुलैला उलगडणार

 


गूढ नजरा आणि अनुत्तरित प्रश्न...
'बोल बोल राणी'चा थरार १७ जुलैला उलगडणार

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत असताना, आता रहस्य, थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला ‘बोल बोल राणी’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट १७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले असून, या पोस्टरने चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.

नव्या पोस्टरमध्ये सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे हे चारही कलाकार अत्यंत गंभीर आणि तणावपूर्ण मुद्रेत दिसत आहेत. हातात बंदुका, चेहऱ्यांवरील तीव्र भाव यामुळे चित्रपटातील रहस्य, संघर्ष आणि धोक्याची चाहूल या पोस्टरमधून स्पष्टपणे जाणवते. प्रत्येक पात्र काहीतरी लपवत असल्याचा भास निर्माण करणारे हे पोस्टर प्रेक्षकांना कथेबद्दल अनेक प्रश्न विचारण्यास भाग पाडते.

‘बोल बोल राणी’ हा एक असा रहस्यप्रधान चित्रपट आहे, जो एका महिलेच्या आयुष्याभोवती विणलेल्या गुंतागुंतीच्या घटनांचा थरारक प्रवास उलगडणारा सिनेअनुभव आहे. नातेसंबंध, विश्वासघात, गूढ घटनांची साखळी आणि अनपेक्षित वळणांनी सजलेली कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणार असल्याची चर्चा आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, '' 'बोल बोल राणी'च्या नव्या पोस्टरमधून आम्ही चित्रपटाच्या रहस्यमय आणि थरारक विश्वाची एक झलक प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक पात्रामागे एक गुपित दडलं आहे आणि हीच गोष्ट कथेला वेगळं रूप देते. प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा आणि प्रत्येक टप्प्यावर नवी उत्सुकता निर्माण करणारा हा चित्रपट आहे. १७ जुलै रोजी हे रहस्य उलगडताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.”

‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित या चित्रपटाचे निर्माते अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली असून, यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकरसह सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बोल बोल राणी’ हा रहस्य आणि थराराचा खेळ आता चित्रपटगृहांत रंगणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.