Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

बचत गटातील महिलांची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

 


दिव्यज्योत संस्थेच्या अध्यक्षा सुनीता कांबळे अटकेत; दि ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी

शिरवाडे वाकद:- बचत गटातील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात दिव्यज्योत संस्थेच्या अध्यक्षा सुनीता संतोष कांबळे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना रविवार दिनांक ७ जून रोजी न्यायालयात हजर केले असता दिनांक ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

       लासलगाव आणि परिसरातील महिलांना शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनांतून शिलाई मशीन, पिठाची गिरणी तसेच वॉशिंग मशीन मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी विविध बचत गटांकडून रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिव्यज्योत संस्थेचे सचिव, संचालक आणि एजंट यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) तसेच ठेवीदारांचे हितसंरक्षण कायदा कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील संशयित संजय बोराळे आणि जयश्री बोराळे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळले आहेत. दरम्यान, संस्थेच्या अध्यक्षा सुनीता कांबळे यांना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील यांनी निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींना हजर केले. प्राथमिक तपासानुसार सुमारे दोन हजार महिलांची एकूण १ कोटी ३९ लाख ५१ हजार ९०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील ॲड रामनाथ शिंदे यांनी युक्तिवाद करताना, आरोपी या संस्थेच्या अध्यक्षा असल्याने आर्थिक व्यवहारांची त्यांना माहिती असण्याची शक्यता असून, इतर फरार आरोपींचा शोध घेणे तसेच व्यवहारांची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर न्यायालयाने सुनीता कांबळे यांना दिनांक ११ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.