हिमोफिलिया असलेल्या रुग्णावर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया
समर्थ वार्तापत्रNovember 04, 2025
0
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकमध्ये हिमोफिलिया असलेल्या रुग्णावर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया
नाशिक येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये हिमोफिलिया A या दुर्मिळ रक्तविकाराने ग्रस्त रुग्णावर मेजर हार्ट अटॅकनंतर यशस्वी प्रायमरी अँजिओप्लास्टी करण्यात आली.
हिमोफिलिया A हा एक आनुवंशिक रक्तविकार असून यात रुग्णाच्या शरीरात फॅक्टर VIII या रक्ताच्या घटकाची कमतरता असते. त्यामुळे अशा रुग्णांना अगदी किरकोळ कारणानेही रक्तस्त्राव होण्याचा गंभीर धोका असतो. अशा रुग्णाला छातीत तीव्र वेदना आणि दम लागणे या तक्रारींसह हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तपासणीत रुग्णाला मेजर हार्ट अटॅक आल्याचे निदान झाले. अँजिओग्राफीमध्ये हृदयातील एक प्रमुख रक्तवाहिनी ९५% अडथळ्याने बंद झाल्याचे आढळले. ही परिस्थिती लक्षात घेता, प्रायमरी अँजिओप्लास्टी हा उपचार करणे अत्यावश्यक होते. परंतु रुग्णाला हिमोफिलिया असल्याने प्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव होण्याचा धोका अत्यंत जास्त होता.
या गुंतागुंतीच्या प्रकरणात डॉ. कांचन भांबरे (कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. निलेश वासेकर (हिमॅटोलॉजिस्ट) यांनी संयुक्तपणे नियोजन करून अत्यंत काटेकोर उपचार पद्धती राबवली.
प्रक्रियेपूर्वी रुग्णाला आवश्यक प्रमाणात फॅक्टर VIII चे इंजेक्शन देण्यात आले, ज्यामुळे रक्तस्त्रावाचा धोका टाळता आला. त्यानंतर रुग्णाची अँजिओग्राफी आणि प्रायमरी अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. उपचारादरम्यान कोणताही रक्तस्त्राव झाला नाही आणि रुग्ण पूर्णपणे बरा झाला. हे प्रकरण म्हणजे बहुविभागीय वैद्यकीय समन्वयाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले असून, वेळेवर केलेल्या निर्णय आणि योग्य उपचारामुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले.
डॉ. कांचन भांबरे (कार्डिओलॉजिस्ट) यांनी या विशेष कामगिरी बद्दल सांगताना म्हटले, “हिमोफिलिया रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय असतो. अँजिओप्लास्टीसारखी प्रक्रिया करताना रक्तस्त्रावाचा धोका टाळणे ही मोठी जबाबदारी असते. आमच्या टीमने काटेकोर नियोजन आणि समन्वयाने उपचार केल्याने रुग्ण पूर्णपणे बरा झाला, हे आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे.”
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. निलेश वासेकर (हेमॅटोलॉजिस्ट) म्हणाले, “हिमोफिलिया रुग्णांच्या उपचारामध्ये फॅक्टर VIII चे योग्य प्रमाण राखणे आणि त्याचा योग्य वेळेत पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. या प्रकरणात आम्ही अचूक फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी दिली आणि कार्डियोलॉजी टीमसोबत समन्वय ठेवत उपचार केले. त्यामुळे रक्तस्त्रावाचा धोका पूर्णपणे टाळता आला.”
याप्रसंगी डॉ.सुधीर शेतकर ( सिनियर कार्डिओलॉजिस्ट)आणि डॉ.गिरीश बच्छाव (कार्डिओलॉजिस्ट) उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले
अशा दुर्मिळ आणि आव्हानात्मक आजारांचे यशस्वी व्यवस्थापन हे अशोका मेडिकव्हर हॉस्पीटलचे तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्याचे आणि टीमवर्कचे प्रतीक आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे प्रत्येक रुग्णाला अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि समर्पित सेवा देण्यास कटिबद्ध आहे.