पुन्हा शिवाजीराजे भोसले - येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित
समर्थ वार्तापत्रOctober 16, 2025
0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांची गोष्ट म्हणजे पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपट – महेश मांजरेकर
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती आणि त्यातून होणाऱ्या आत्महत्या यासारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करणारा, आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी खुद्द छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा भूतलावर अवतरले तर काय होईल असा विषय असलेल्या पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. महेश मांजरेकर यांचे लेखन दिग्दर्शन असलेला तथा झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. याच निमित्ताने चित्रपटाची टीम नाशिक दौऱ्यावर आली होती.
नाशिकच्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ‘’शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयाचा सखोल अभ्यास करताना मला जाणवलं की, यावर काहीतरी करायलाच हवं. समाजासमोर हा प्रश्न मांडायला हवा. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांना घेऊन एक चित्रपट करण्याचा विचार करत होतो आणि त्या प्रक्रियेत या चित्रपटाची निर्मिती झाली. सध्याच्या काळातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून महाराज किती संतप्त होऊ शकतात, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा आहे. मुळात हा चित्रपट कोणत्याही राजकारण्यांना बोट दाखवण्यासाठी नाही, तर सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. सध्याच्या शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा खरा अंदाज प्रेक्षकांना यातून येईल. मला विश्वास आहे की, या चित्रपटातून समाजात जागृती निर्माण होईल आणि अनेकजण पुढे येऊन मदतीचा हात देतील. हा विषय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशातील अनेक भागांत अशीच परिस्थिती दिसून येते. सध्या हा चित्रपट मराठी भाषेत आहे, मात्र पुढील काळात तो हिंदीत सादर करण्याचाही आमचा विचार आहे.’’
चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अभिनेते आणि नाशिककर असलेले सिद्धार्थ बोडके म्हणाले की , “ महाराजांची भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी केवळ सुवर्णसंधी नव्हती तर ती एक मोठी जबाबदारी होती. विशेषतः या चितपटातील महाराज साकारणे हे खूप आव्हानात्मक होतं कारण ह्यातील महाराज हे केवळ इतिहासातील नाहीयेत तर ते वर्तमानतील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर कमालीचे संतापलेले आहेत. त्यांचा तो संताप, त्वेष, चिडचिड त्याच ताकदीने पोहचावी यासाठी मेहनत घ्यावी लागली. यामध्ये महेश सरांची खूप मदत झाली.
चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारणारे राष्ट्रीय पारितोषिक विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांनीही आपल्या भूमिकेबद्दलची माहिती दिली आणि चित्रपटातील संवादही बोलून दाखवले. यावेळी संवादलेखक सिद्धार्थ साळवीसुद्धा उपस्थित होते.
चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि सयाजी शिंदे हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी निर्मिती केली असून झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.