Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

समर्थ वार्तापत्र

समर्थ वार्तापत्र

हिंदवी स्वराज्य आणि स्वातंत्र्याचा अमृतकाळ

 

  महाराज ! आमच्यातून तुम्ही निघून गेलेल्या घटनेला जवळजवळ चारशे वर्षं होतील.तुमच्या गुरु असलेल्या आऊसाहेबांच्या मांडीवर बसून राजकारणाचे धडे गिरवताना प्रभू श्री रामचंद्र,भगवान श्रीकृष्ण यांच्या पराक्रमाच्या कथांमधून प्रेरणा घेऊन सर्वसामान्यांच्या सोबतीने 'हिंदवी स्वराज्य' या नावाने स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा चमत्कार तुम्ही घडवलात.राजसत्तेच्या मागे तुम्ही धर्माचं भक्कम अधिष्ठान उभं केलेल्या दैदिप्यमान सोहळ्याला अर्थात तुमच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत याचा आम्हाला गर्व आहे.तुम्ही प्रस्थापित केलेल्या हिंदवी स्वराज्यात सुरक्षितता आणि संपन्नतेने न्हाऊन निघालेली रयत तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत होती.जन्मोजन्मी असाच राजा मिळावा अशी मनोमन प्रार्थना करत होती.मात्र तुमच्या नंतर देश पुन्हा पारतंत्र्यात गेला.पण तुमच्याकडून प्रेरणा घेतलेल्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं मोल देऊन ब्रिटिशांना हद्दपार करत१९४७ साली पुन्हा स्वातंत्र्य प्रस्थापित केलं.या स्वातंत्र्यालासुद्धा पंच्याहत्तर वर्षं पूर्ण झाली.देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करीत आहे.मात्र या अमृतकाळातही कित्येक नागरिकांच्या दारिद्र्याचा काळ त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे.किमान मूलभूत सुविधांपासून कित्येक नागरिक आजही वंचित आहेत. खेड्यापाड्यातली कित्येक कुटुंबं अजूनही अंधारात चाचपडत आहेत.शिक्षण कशाला म्हणतात ते अजूनही कित्येक मुलांना माहित नाही.लाखोंच्या पोटाची भूक भागवणाऱ्या बळीराजांच्या अजूनही आत्महत्या होत आहेत.नदीला आलेल्या पुरातून स्मशानभूमीअभावी प्रेत खांद्यावर घेऊन जात असताना जीव मुठीत घेऊन जावं लागत असल्याने मृत्यूनंतरही कित्येकांच्या आयुष्याची फरपट चालूच आहे. उच्चशिक्षित झालेल्या कित्येक तरुणांचे हात मोलमजुरी करत आहेत.दुर्गम भागात अजूनही रस्ते पोहोचले नसल्याने रुग्णांना,गरोदर महिलांना,सर्पदंश झालेल्या लोकांना उपचारासाठी मूळ शहरापर्यंत डोलीतून आणावं लागत आहे.पण तिथपर्यंत पोहोचूनही अपेक्षित उपचार उपलब्ध असतीलच याची खात्री देता येत नाही.त्यामुळे कित्येक रुग्णांना अर्ध्या वाटेतच प्राण सोडावे लागत आहेत. रस्त्याअभावी दुर्गम भागात रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने अनेक विनवण्या करून मिळेल त्या वाहनात टाकून गरोदर महिलांना प्रसूतीसाठी नेलं जात असताना जागोजागीच्या खाचखळग्यांच्या त्रासामुळे काहींची वाटेतच प्रसूती होत आहे.यात काही महिला दगावत आहेत तर काही बालकं जग पाहण्याच्या अगोदरच दुर्दैवाने डोळे मिटत आहेत.तंत्रज्ञानाने प्रगत झालेल्या आजच्या युगात चांद्रयान चंद्रावर पोहोचल्याचा अभिमान नक्कीच आहे.पण कित्येक कुटुंबं अजूनही भाकरीच्या चंद्रासाठी संघर्ष करत आहेत.बेसुमार वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य त्रस्त आहेत पण राजकारणी मात्र फोडाफोडीमध्ये व्यस्त आहेत.
महाराज! महाभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना श्रीकृष्णाने तिची लाज राखली.यातून प्रेरणा घेऊन महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय तोडून तुम्ही महिलांबद्दलचं तुमचं धोरण स्पष्ट केलंत.पण आधुनिक भारतातल्या अबलांची निर्वस्त्र धिंड निघत असताना जागोजागींच्या दुश:सनांपुढे श्रीकृष्ण मात्र मौन बाळगून आहे.महिला खेळाडूंना रस्त्यावरून फरपटत नेलं जात आहे. आपल्या क्रीडानैपुण्याने देशाची मान अभिमानाने उंचावणारे कित्येक खेळाडू हालअपेष्टांचं जीवन जगत आहेत. कित्येक महिलांची पाण्यासाठीची वणवण अजूनही थांबलेली नाही.सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशातच विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे.कोणत्या शतकात जगत आहोत आम्ही ? महाराज ! तुमच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीतली बालपणीची पंधरा वर्षं सोडली तर पस्तीस वर्षांच्या धकाधकीच्या आयुष्यात तुटपुंजी सामुग्री घेऊन मुठभर मावळ्यांच्या साथीने तुम्ही स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य समस्त रयतेला आपलं वाटत होतं. रयतेच्या पदरात तुम्ही टाकलेल्या तुमच्या कर्तुत्वाच्या दानाने रयत कृतकृत्य झाली होती.मग स्वातंत्र्यानंतरच्या तब्बल पंच्याहत्तर वर्षात स्वतःला जनतेचे कैवारी म्हणणारे राज्यकर्ते काय करत होते ? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. महाराज ! परकीय आक्रमणाविरोधात तुम्ही तलवार उपसली नसती तर आमचे पूर्वज तेव्हाच कापले गेले असते. मग आजचा चंद्र,सूर्य आम्ही पाहिलाच नसता.याची पुरेपूर जाण ठेवणं हे आम्ही आमचं कर्तव्यच समजतो.पण या महाराष्ट्रात राजकीय मतलबसाठी कधी नव्हे एवढी तुमच्या जयजयकराची चढाओढ लागली आहे.तुमच्या पराक्रमाची शौर्यगाथा तुमच्या स्मारकाजवळ फोटो काढण्यापुरतीच मर्यादित झाली आहे.'मराठे कधीच कुणापुढे झुकत नाहीत' या तुमच्या स्वाभिमानी डरकाळीने औरंग्याच्या तख्ताखाली तुम्ही भूकंप घडवलात.पण तुमच्याच महाराष्ट्रात तुमचा अवमान करणारी अनाजीपंतांची प्रवृत्ती उजळ माथ्याने फिरत आहे.हे बघून मन उद्विग्न होतं.
महाराज ! आजच्या एकवीसाव्या शतकातल्या भारतात अर्जुनाचा बाण दुर्योधनाच्या हातात देऊन शकुनी मामांनी अर्जुनाचाच वेध घेण्याचा चंग बांधला आहे.या सर्व गोष्टींचा उबग आलेली जनता सत्तेसाठी राजकारण्यांनी गुंडाळून ठेवलेला स्वाभिमान कुठे सापडतो का ते हाताशपणे पाहत आहे.असं असलं तरी काश्मीरभोवतीचा झुगारून दिलेला ३७० कलमाचा पाश ही भारतीय सार्वभौमत्वाच्या अखंडतेसाठी समाधानाची बाब आहे. मृत्यूनंतरही शेकडो वर्षांचा वनवास भोगणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांचा दृष्टीक्षेपात आलेला गृहप्रवेशही समस्त भारतीयांसाठी गौरवास्पद आहे.पण महाराज ! असं असलं तरी पंचवीसाव्या शतकाकडे नजर ठेवून एकविसाव्या शतकात जगत असताना आपल्या रयतेला राजकारण्यांच्या कमालीच्या उदासीनतेमुळे किमान मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचं पाहून कदाचित पुन्हा जन्म घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर कृपया असं करू नका.कारण तुम्ही पुन्हा जन्म घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केलात तर शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी तुम्हाला दिलेली मुद्रा आणि हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज इतकच काय पण तुम्ही तुमच्या राजवटीला दिलेलं हिंदवी स्वराज्य हे नावसुद्धा तुमच्याकडून कधी ओरबाडून घेतलं जाईल हे कळणारसुद्धा नाही.म्हणूनच त्याऐवजी हिंदवी स्वराज्याच्या न्यायाने देशातला प्रत्येक नागरिक सर्वार्थाने सुखी,समृद्ध करण्याच्या कामी राज्यकर्त्यांना सुबुद्धी देण्यासाठी आई तुळजाभवानीला तुम्ही गार्‍हाणं घाला.तुमचं गार्‍हाणं ती नक्की ऐकेल.याबद्दल आम्हाला विश्वासच नव्हे तर खात्री आहे.एवढीच तुमच्या साडेतीन शतकीय राज्याभिषेक सोहळ्याच्या आणि स्वातंत्र्याच्या अमृतकाळाच्या निमित्ताने तुम्हाला कळकळीची विनंती.

मिलिंद मधुकर जाधव
बोर्लीपंचतन-श्रीवर्धन
९०२८६६४१४२

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.