प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन
गणेश केदारे, मनमाड
नाशिक जिल्ह्यासह मनमाड मध्येही गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असल्याने, राज्यातील अनेक भागात डोळ्याची साथ पाहायला मिळत आहे. दरम्यान मनमाड मध्ये डोळे येण्याची साथ येत असून बहुसंख्य नेत्र विकार तज्ञांकडे डोळ्यांच्या तक्रारी करणार्या रुग्णांची संख्या वाढली आहे. डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यपणे प्रथम एकाच डोळ्याला होतो. मात्र एक डोळा आल्यानंतर दुसर्या डोळ्यालाही संसर्ग होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन नेत्र विकार तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.
डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो, त्याला कॅान्जुक्टीव्ह म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊन डोळे चोळावेसे वाटतात. त्यालाच ‘डोळे आले’ असे म्हणतात. डोळे आल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारामुळे आले आहेत, याचे निदान करून उपचार करायला हवेत. काहीवेळा संसर्गामुळे डोळे येतात तर काहीवेळा ऍलर्जीमुळे डोळे येतात.
सद्यस्थितीत पावसाळी वातावरणातील बदलांमुळे डोळे येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यानं रुग्णांनी बाहेर जाणं टाळावं, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. तसेच, या साथीचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णांनी घरी बसून आराम करावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या चारपाच दिवसांपासून डोळ्यांची साथ पसरू लागली आहे. या प्रकारात डोळ्यांना सूज येते,डोळे चुरचुरतात, खुपतात अशीच काहीशी लक्षणं दिसून येत आहेत.
अशी आहेत लक्षणे : डॉक्टर रवींद्र मोरे सर मनमाड उपजिल्हा रुग्णालय नेत्र चिकित्सक अधिकारी
डोळ्यांना जळजळ होणे.
डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे.
डोळ्यात लालसरपण येणे.
डोळ्यांना सूज येणे.
डोळ्यांना खाज सुटणे .
डोळ्यांना चिकटपणा येणे.
सुज येणे.
डोळयातून पिवळा द्रव बाहेर येणे.
अशी घ्या काळजी
डोळे आल्यास डोळ्यांना सतत हात लावू नये.
डोळे सतत स्वच्छ पाण्यानं धुवावेत.
डोळे येणं हा संसर्गजन्य रोग असल्यानं प्रवास किंवा बाहेर फिरणे टाळावे.
कुटुंबीयांपासून दूर राहावे.
तेलकट खाणे टाळावे.
डोळ्याची जळजळ व त्रास काही ठराविक दिवसांनंतरही कमी होत नसल्यास डॅाक्टरी सल्ला घ्यावा.
डोळे आल्यास अस्वच्छ हाताने डोळे चोळू नये. तसेच डोळ्यांना स्पर्श केल्यास लगेच हात धुवून घ्यावेत.
डोळे आलेल्या व्यक्तींचे कपडे, टॅावेल इतरांनी मुळीच वापरू नयेत.
डोळे येणे हा एकप्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. विशेषत पावसाळयात हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. या आजारालाच पिंक आय असेही म्हटले जाते. कधीकाळी दोन्ही डोळयांवर संसर्ग होवू शकतो. डोळयांचा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असला तरी यात नागरिकांनी वैद्यकीय तात्काळ सल्ला घेणे आवश्यक आहे.
