सप्तशृंग गडावर रामनवमीपासून चैत्रोत्सवास प्रारंभ
March 25, 2023
0
सप्तशृंग गड (प्रतिनिधी) :
महाराष्ट्राचे आराध्यदैवत, अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर रामनवमीपासून दि. 30 मार्च ते दि.6 एप्रिलदरम्यान चैत्रोत्सव होणार आहे. यासाठी न्यासाच्या वतीने विविध पूजा व विधींसाठी तयारी झाली असून, ग्रामपंचायतसुद्धा भाविकांच्या व्यवस्थेसाठी पाणी व स्वच्छतेसाठी नियोजन करीत आहे.
दि. 30 मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता ट्रस्टचे विश्वस्त, तहसीलदार, सरपंच, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ट्रस्ट कार्यालयापासून मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणांची मिरवणूक काढण्यात येणार असून, प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हे सकाळी साडेसात वाजता देवीची पंचामृत महापूजा व आरती करणार आहेत. दुपारी 12 वाजता देवी मंदिरात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
चैत्रोत्सवादरम्यान मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार असून यादरम्यान दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री भगवतीची आरती व पंचामृत महापूजा होणार आहे. दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता भगवती शिखरावरील ध्वजपूजन व दुपारी साडेतीन वाजता पारंपरिक देवीभक्त गवळी पाटील यांच्या उपस्थितीत ध्वज मिरवणूक व रात्री बाराच्या सुमारास सप्तशृंग शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता भगवतीची पक्षालय पंचामृत महापूजा करून सकाळी 11 ते 5 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

